Published On : Thu, Aug 1st, 2019

महसूल विभाग हा विकासाचा केंद्रबिंदू – डॉ. संजीव कुमार

Advertisement

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्याचा गौरव

सामान्य जनतेला सहज सुलभ सेवा द्या

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महसूल विभागाची असल्यामुळे हा विभाग विकासाचा केंद्रबिंदू आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत सहज व सुलभ पोहचविण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

बचत भवन सभागृहात महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्‍त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा‍धिकारी अश्विन मुदगल, नोंदणी महानिरीक्षक प्रकाश पाटील, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग,रोजगार हमी योजनेचे उपायुक्त के. एन. के. राव,माफसूचे कुलसचिव चंद्रभान पराते, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हा‍धिकारी सुजाता गंधे उपस्थित होते.

राज्य शासनाच्या सर्व विभागांमध्ये समन्वय साधणारा हा विभाग असून, महसूल विभागाने काळानुरुप बदल अंगिकारले आहेत. या विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनीही स्वत:ला नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावे. शासनाच्या विविध कल्याणकारी आणि लोकाभिमुख योजना जास्तीत-जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रयत्नरत राहीले पाहिजे, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

महसूल अधिकाऱ्यांची विकासकामांमध्येमहत्त्वपूर्ण भूमिका आहे, ही जबाबदारी ओळखून ती यशस्वीरीत्या पार पाडावी. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बदलत्या काळानुसार स्वत:मध्ये जबाबदारीनुसार सकारात्मक बदल केले पाहिजेत. विभाग आणि अधिकाऱ्यांनी अद्ययावत राहिले पाहिजे. त्याचा महसूल विभागाला फायदा होतो. दैनंदिन कामकाजात नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम सहज, सोपे आणि सर्वांना सोयीस्कर करण्याकडे अधिकारी वर्गाचा कल असावा, जेणेकरुन नागरिकांना मदत होईल. नागरिकांच्या अडचणी दूर करता येतील. महसूल विभागाने नेहमी प्रशासनात प्रशासक,समन्वयक आणि नियंत्रक राहिले पाहिजे. कारण समाजामध्ये महसूल अधिकाऱ्यांचे वेगळे महत्त्व असते, एक वेगळी ओळख असते, असे त्यांनी सांगितले.

महसूल विभागात काम करताना कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा. त्यामुळे कामाचा ताण जाणवणार आणि तसेच सहकाऱ्यास मदत करण्यास नेहमी तत्पर राहण्याचे आवाहनही विभागीय आयुक्त यांनी केले.

जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महसूल विभागाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत महसूल विभागाचे राज्य शासनामधील महत्त्व विशद केले. स्वातंत्र्यानंतर संविधानाने घालून दिलेल्या मूल्यांवर आधारित विभाग काम करत आहे. हा विभाग ब्रिटीशकालीन असल्यामुळे त्यामध्ये काळानुरुप बदल करण्यात आले. तीव्र गतीने होणाऱ्या बदलानुसार महसूल विभागातही मोठ्
या प्रमाणावर परिवर्तन झाले. आजघडीला महसूल विभागाला शासनाच्या विविध विभागांसोबत समन्वय साधण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हा थेट जनतेशी संबंधित विभाग असल्यामुळे या विभागावर जनतेचा मोठा विश्वास असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी सूरज वाघमारे, काटोलचे तहसीलदार अजय चरडे,नायब तहसीलदार आभा बोरकर, आणि ए. एम. कमलाकर, उमेश घुगुसकर, अमित हाडके, संदीप जाधव, ओमप्रकाश नेहरकर, ए. सी. धनविजय, प्रदीप कोल्हे व गंगाधर वरठी या महसूल कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांचेही समयोचित भाषण झाले. तसेच अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांनी प्रास्ताविकात महसूल दिनाचे महत्त्व आणि कामकाजाविषयी माहिती दिली. तर निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी आभार मानले.

Advertisement