महापौर नंदा जिचकार यांचा विश्वास : आई कुसुम सहारे स्मृती विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन
गतविजेत्या नवरंग क्रीडा मंडळाची विजयी सलामी
नागपूर: आज नागपूर शहरात विकास कामांसह सर्वत्र क्रीडा वातावरण निर्मिती होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवामुळे त्यात अधिक भर घातली गेली आहे. नागपूर महानगरपालिका आणि आई कुसूम सहारे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भस्तरीय फुटबॉल स्पर्धा मागील अनेक वर्षांपासून विदर्भातील प्रतिभावंत खेळाडूंना महत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटविला आहे. फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून विदर्भातील खेळाडूंना मोठी संधी निर्माण करून देण्याचे कार्य आयोजक आरोग्य समितीचे उपसभापती नगरसेवक नागेश सहारे यांच्यामार्फत होत आहे. हे कार्य पुढेही असेच सुरू राहिल्यास लवकरच विदर्भासह आपल्या नागपूर शहरातून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू पुढे येतील, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिका आणि आई कुसूम सहारे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५वी आई कुसूम सहारे स्मृती विदर्भास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे गुरुवारी (ता.१) रेशीमबाग मैदानावर महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती विजय (पिंटू) झलके, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, शिक्षण समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, माजी आमदार मोहन मते, स्पर्धेचे आयोजक नगरसेवक नागेश सहारे, नगरसेवक सतीश होले, नगरसेवक दिनेश यादव, मनपाचे क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, क्रीडा प्रशिक्षक एस.जे. अँथोनी, सुनील नांदुरकर, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे सचिव एडविन एन्थोनी, आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पीयूष पाटील, लालाजी पांडे, धीरज मानवटकर, दशरथ पांडे, जयंत टेंभुर्णे, विजय ढवळे, किशोर गौर, आजम खान, चिंटू मेश्राम, राजू कोसे, शैलेश तिनखेडे उपस्थित होते.
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी फुटबॉलला किक मारुन स्पर्धेचे उद्घाटन केले. स्पर्धेचा उद्घाटन सामना गतवर्षीचा विजेता संघ नवरंग क्रीडा मंडळ (अजनी) व उपविजेता हिलटॉप क्रीडा मंडळ (सेमीनरी हिल्स) यांच्यात झाला. सामन्यापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी उभय संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेमध्ये गतविजेत्या नवरंग क्रीडा मंडळ (अजनी) संघाने हिलटॉप क्रीडा मंडळ (सेमीनरी हिल्स) संघाचा पराभव करुन विजयी सलामी दिली.
माजी आमदार मोहन मते यांनीही यावेळी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. स्पर्धेच्या आयोजनामुळे विदर्भातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. जवळपास महिनाभर चालणा-या या स्पर्धेने आपली वेगळी छाप खेळाडूंवर सोडली असून खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन आई कुसुम सहारे फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पीयूष पाटील यांनी केले तर आभार फाऊंडेशनचे सचिव एडविन एन्थोनी यांनी मानले. २० ऑगस्टपर्यंत चालणा-या या स्पर्धेसाठी विदर्भातील ७० संघांनी प्रवेश निश्चित केले आहे.
नवरंग संघाचा सलामी विजय
स्पर्धेतील उद्घाटीय सामन्यात गतविजेत्या नवरंग क्रीडा मंडळ (अजनी) संघाने गतउपविजेता हिलटॉप क्रीडा मंडळ (सेमीनरी हिल्स) संघाला १-० ने पराभूत केले. उभय संघांनी आक्रमकरित्या सामन्याची सुरुवात केली. दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांवर चढाई करण्यास सुरुवात केली. मात्र, रक्षणफळीने कुणालाही आघाडी घेऊन देण्याची संधी दिली नाही. दरम्यान सामन्यातील ३० मिनिटे झाल्यानंतर पहिल्या हाफमध्ये कुणालाही गोल करण्याची संधी मिळाली नाही. मध्यांतरानंतर दुसऱ्या हाफमध्ये उभय संघाच्या आक्रमकफळीने पुन्हा गोल करण्यास संघर्ष केले.
मात्र, दोन्ही बाजुच्या रक्षणफळीने गोल करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या हामधील ३० मिनिटे आटोपल्यानंतर दोन्ही संघांना गोल करता न आल्याने हा सामना अतिरिक्त वेळेत खेळला गेला. १० मिनिटांच्या या खेळात गतविजेता नवरंग क्रीडा मंडळाने उत्कृष्ट खेळी करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या मिनिटाला नवरंगच्या राहुल मुंद्रीने (६२ मी.) हिलटॉपच्या गोल रक्षकाला चकमा देत गोल करून संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. ही आघाडी नवरंगने कायम ठेऊन सलामी विजय आपल्या नावी केले.