माझ्या जीवनमरणाची आणि त्याचे फळ देण्याची ही निवडणूक आहे -धनंजय मुंडे यांचे परळीकरांना भावनिक आवाहन
बीड : जनतेच्या प्रश्नाची आस्था आणि जाण असावी लागते परंतु दुर्दैवाने हे सरकार तसे वागताना दिसत नाही असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी परळीच्या जाहीर सभेत केला.
सरकार आज बेरोजगारी वाढवत आहे. उद्योग बंद होत आहेत. रोजगार नाहीय. मंदीचे सावट आहे असे विदारक चित्र राज्यात पाहायला मिळत आहे असेही अजितदादा पवार म्हणाले. महाराष्ट्र मुलींवर अत्याचारात तिसर्या क्रमांकावर आहे, मुख्यमंत्र्यांना लाज कशी वाटत नाही असा थेट सवाल अजितदादा पवार यांनी केला. हजारो लाखो लोक आज बेकार होत आहेत. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का? उद्योगपतींना बोलवायची असा सवाल करतानाच आम्ही त्यावेळी बोलवत होतो. मार्ग काढत होतो अशी आठवणही अजितदादा पवार यांनी सरकारला करुन दिली.
मंत्र्याचे कारखाने एफआरपी देत नसतील तर कायद्याचा वापर करा. तुमच्या श्रमाचा पैसा आहे तो सोडू नका. भोंगळ कारभार सुरू आहे त्याला अंकुश घातला पाहिजे असेही अजितदादा पवार यांनी सांगितले. एक पैशाचा मिंधा त्या राज्य सहकारी बँकेचा नाही. निवडणूक आली की असं याचं काय होते हेच कळत नाही असा टोला सरकारला लगावला. बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करता तर जनतेचे प्रश्न सोडवा. डॉ. अमोल कोल्हे संसदेत तडफेने प्रश्न ते मांडत आहेत याची आठवण अजितदादा पवार यांनी स्थानिक खासदारांना करुन दिली.
विधानसभा, लोकसभेला आपल्याला फटका बसला आहे. आता मात्र जनतेने पराभवाने खचून न जाता पराभव भरुन काढा असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.
माझ्या जीवनमरणाची आणि त्याचे फळ देण्याची ही निवडणूक आहे -धनंजय मुंडे यांचे परळीकरांना भावनिक आवाहन
मी या परळीची २४ वर्षे सेवा करतोय. तुमची सेवा करण्यात कमी पडलोय का? माझ्या घरावर तुळशी पत्र ठेवत माझी ९० ते १०० एकर जमीन विकून तुमची सेवा करत राहिलो आहे. मी कमी पडत नसेन तर माझ्यात काय कमी आहे असा सवाल करतानाच . माझ्या जीवनमरणाची निवडणूक आहे. त्याचे फळ देण्याचे ही निवडणूक आहे असे भावनिक आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळीच्या जाहीर सभेत केले.
आम्ही उत्सव साजरा करणार नाही कारण आमचा जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याच्या भयंकर संकटाने परळी नगरी हैराण आहे. परळीनगरीचं स्वराज्य सध्या बिघडलेले आहे. दहा वर्षांत या परळी मतदारसंघातील लोकांना काय मिळाले असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.माजलगाव धरणातून जायकवडीचे पाणी नागापूरच्या बांध धरणात आणणार हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे याचं स्वप्न होते परंतु हे स्वप्न पूर्ण होवू शकलेले नाही हे दुर्दैव आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
दोन वेळा परळीकरांनी निवडून दिले. मंत्रीमंडळात मोठे पद असताना त्यांना का पाणी आणता आले नाही असा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे.परळी एमआयडीसीबाबत बैठक लावायला सांगितली होती ती बैठक झालीही त्यावेळी शेतकऱ्यांची जमीन घ्यायची गरज नाही असे मी सांगितलं होतं. त्यावेळी सकारात्मक विचार झाला. सर्व्ह झाला त्यावेळी त्यांना कळंल की एमआयडीसी होवू शकते परंतु पाच वर्ष झाली… का झाली नाही एमआयडीसी असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.
उदयोगपतींशी चांगल्या ओळखी आहेत तर का उद्योग आणता आला नाही याचं उत्तर दिले पाहिजे.
८० मेगावॅटचा प्रकल्प ५०० कोटी गुंतवणूक करुन या मातीत आला. आम्ही मातीशी नाळ राखून आहे. माझं भांडण लोकांच्या मनातील गोष्टींसाठी आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. मी मोठया मनाने इथे त्यांना उमेदवारी दिली होती. मोठं मन करुन मतदारसंघ दिला कारण परळीत क्रांती येईल परंतु क्रांती आली नाही मात्र यांच्या घरात क्रांती झाली असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
मी विकासाच्या पलीकडे राजकारण कधी केलं नाही. निवडणूक आली की भाऊ विरोध करतो.. डोळ्यात पाणी आलं रं आलं की, तुम्हाला काही वाटत नाही. तुमच्या मतदारसंघात विकास व्हावा असं वाटतं. हे स्वप्न मी बघत असेन तर मी विरोध कसा करतो. माझ्या वडीलांनी लहान भावाची इच्छा पुर्ण केली.परंतु कारखान्याची अवस्था आज काय आहे. ऊस घालताना राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीचा कोण याची यादी काढण्यात आली. माजलगाव कारखान्याचे पैसे २३०० रुपये वैजनाथचे कसे दिले. लोकसभेत जास्त खर्च झाला किंवा विधानसभेत खर्च करावयाचा असेल म्हणून ठेवले असेल अशी टिकाही धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा पालवे मुंडे यांच्यावर केली.
राष्ट्रवादीची नगरपंचायत आणि खासदार, आमदार कुणाचा आहे मग पाणी का दिले नाही. पाणी पाजायला आम्ही असतो मायबाप जनतेने याचा विचार करावा असेही धनंजय मुंडे म्हणाले. गावातील प्रत्येक घरातील उंबरठ्यावर डोकं टेकायला येणार आहे. लेकराच्या विजयाची जबाबदारी घेणार आहात का?असे भावनिक आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. या परळीची २४ वर्षे सेवा करतोय मी सेवा करण्यात कमी पडलोय. घरावर तुळशी पत्र ठेवलंय. ९० एकर जमीन विकून तुमची सेवा करत राहिलो आहे. मी कमी पडत नसेन तर माझ्यात काय कमी आहे. माझ्या जीवनमरणाची निवडणूक आहे. त्याचे फळ देण्याचे ही निवडणूक आहे असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले.
दादांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणण्यात आम्ही समर्थ आहोत. सत्तेत असताना काय मिळाले आणि मी सत्तेत नसताना काय केले हे इथल्या जनतेला माहित आहे. या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे हे पाहिले. पक्षाची आणि माझ्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर मनभेद करतील मतभेद करतील. आपलं काय ठरलंय… असा आवाज धनुभाऊ यांनी दिला असता… परळीचा आमदार धनुभाऊ… असा जोरदार आवाज जनतेतून देण्यात आला.
आमदार केलात तर पाच वर्षांत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून दाखवतो. दोन वेळेला लेकीला आशिर्वाद दिलात तसा यावेळी या तुमच्या लेकाला आशिर्वाद द्या असे सांगतानाच या मतदारसंघाची अशी ताकद निर्माण करु की, या मतदारसंघाला विचारत घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण होणार नाही. त्यामुळे संधी द्या असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.
मालिकेत व चित्रपटातील नायक आजवर पाहिले परंतु आज खरा नायक या परळीत पाहिला-खासदार डॉ. अमोल कोल्हे
पाच वर्षांत विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना पुरुन उरला आहे हे लक्षात घ्या. मालिकेत व चित्रपटातील नायक आजवर पाहिले परंतु आज खरा नायक या परळीत पाहिला असे सांगतानाच परळीकर तुम्ही भाग्यवान आहात हा तुमचा वाघ महाराष्ट्रात गर्जत आहे त्यामुळे त्यांना निवडून द्या असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी परळीकरांना केले.
पाच वर्षांत सरकारचा कारभार बघत आहात. छत्रपतींचा आशिर्वाद घेवून सत्तेवर आले परंतु आज दिवसाला ४ ते ५ शेतकरी आत्महत्या करत आहेत याची आठवण डॉ. अमोल कोल्हे यांनी करुन दिली.
आमच्यामुळे तुमच्या कपाळावरील कुंकु पुसले गेले असे मुख्यमंत्र्यांनी त्या माऊलीला सांगायला हवं होतं परंतु त्या विधवा महिलेला स्थानबद्ध केलं हे असलं सरकार आहे हे लक्षात घ्या. हे विदारक आणि भेसुर चित्र आहे.
धनुभाऊंची गरज महाराष्ट्राला आहे त्यामुळे तुम्ही त्यांची ताकद आहात असेही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. गिरीश महाजन यांनी भविष्य सांगण्याचा धंदा कधी सुरु केला माहिती नाही. परंतु त्यांना एक सांगतो बुरुज ढासलला म्हणून किल्ला ढासळत नाही हे लक्षात घ्या असे जाहीर आव्हान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.यावेळी बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सभेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले. शिवस्वराज्य यात्रेचे आगमन परळी शहरात होण्याअगोदर पाच किलोमीटर अंतरावरुन भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. युवकांचा या रॅलीत मोठा सहभाग होता.
शिवस्वराज्य यात्रेचा आजचा पाचवा दिवस असून तिसरी सभा परळी येथे प्रचंड प्रतिसादात पार पडली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण,प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर आदींसह परळी मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.