नागपूर:एसएनडीएल ने आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळें शहरातील विज वितरण व्यवस्था सांभाळंण्यास असमर्थंता दर्शवली व महावितरणला वरील क्षेत्राचा ताबा घेण्यास विनंती केली होती या अनुषंगाने ग्राहकांची गैरसोय टाळंण्यासाठी आज रविवार दि. 8 सप्टेंबर 2019 च्या मध्यरात्री पासुन महावितरणने नागपूर येथील वितरण व्यवस्था ताब्यात घेत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा, नवीन व नविकरणिय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकूळे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर शहरातील महाल, गांधीबाग व सिव्हील लाईन या विभागाची एकत्रीत विज वितरण हानी 30.06 टक्के होती म्हणुन या विभागातील वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 1 मे 2011 पासून मे. एस. एन. डी. एल. या कंपनीची वितरण फ्रेंचाइझी म्हणुन नियुक्ती केली होती. तेव्हा पासुन सदर फ्रेंचाइझी वरील विभागातील वितरण व्यवस्था आजतागायत सांभाळंत असुन 2019 मधील या विभागाची विज वितरण हानी 13.74 टक्के आहे. मे. एस. एन. डी. एल ची आर्थिक परिस्थिती डबघाईस आल्यामुळें कंपनीने दिनांक 12 ऑगस्ट 2019 व दिनांक 6 सप्टेंबर 2019 च्या पत्रान्वये नागपूर शहरातील विज वितरण व्यवस्था सांभाळंण्यास असमर्थंता दर्शवली व महावितरणला वरील क्षेत्राचा ताबा घेण्यास विनंती केली होती, याअनुषंगाने वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील ग्राहकांची गैरसोय टाळंण्यासाठी आज रविवार दिनांक 08. सप्टेंबर 2019 च्या मध्य रात्री पासुन महावितरणने नागपूर येथील वितरण व्यवस्था ताब्यात घेण्याचे ठरविले आहे. यामुळे वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील ग्राहकांना महावितरण अखंडीत आणि दर्जेदार विजपुरवठा देणार यशस्वी ठरेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मे. एस. एन. डी. एल. चे पुरवठादार व कर्मचारी यांची मे. एस. एन. डी. एल. ने कळंविलेली थकीत देणी, महावितरणला येणे असलेल्या रक्कमेतुन टप्याटप्याने देण्याचे निश्चित करण्यात येईल, यासाठी या सर्वांकडून महावितरणला ग्राहकसेवा व थकबाकी वसुलीसाठी संपुर्ण सहकार्याची अपेक्षा असून मे. एस. एन. डी. एल. चे नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना चर्चेव्दारे महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचार्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वितरण फ्रेंचाइझी क्षेत्रातील वितरणप्रणाली ताब्यात घेण्याच्या दृष्टीने महावितरणने 3 कार्यकारी अभियंते, 9 अतिरिक्त कार्यकारी अभियंते, 6 उपकार्यकारी अभियंते व 29 सहाय्यक अभियंता यांची नियुक्ती केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
वितरण फ्रेंचाइझी भागातील विद्युत वितरण प्रणालीच्या देखभालीकरीता महावितरणने एकुण 105 तांत्रिक कर्मचारी (35 विज वितरण केंद्राकरीता प्रत्येक पाळी करीता एक तांत्रिक कर्मचारी असे एकुण 105 तांत्रिक कर्मचारी) व 40 यंत्रचालकांची उपकेंद्र संचालनाकरीता प्रतिनियुक्ती केली असून ही सर्व प्रतिनियुक्ती वितरण प्रणालीचा अभ्यास करण्याकरीता केलेली आहे. याशिवाय फ्रेंचाइझी भागातील कार्यभार सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने मंडळं कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची (मोबाईल क्रमांक 7875760070) स्थापणा करण्यात आलेली आहे, त्याकरीता प्रत्येक पाळीत सहाय्यक अभियंता नियुक्त करण्यात आला असून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास महावितरण कटीबद्ध आहे. सर्व ग्राहकांनी सद्य परिस्थितीत महावितरणला नेहमीप्रमाणेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहनही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर कोहळे, आमदार मिलींद माने यांचेसह नागपूर महापालीका कोर समितीचे सदस्य, महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंते राकेश जनबंधू, उमेश शहारे, दिलीप दोडके, नारायण आमझरे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.