सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी घेतला प्रलंबित कामाचा आढावा
नागपूर: महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी अशा योजनेतील एक म्हणजे रमाई घरकुल योजना. या योजनेतील आसीनगर झोनमधील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप सोमवारी आयोजित गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीमध्ये करण्यात आले. यावेळी सभापती तारा (लक्ष्मी) यादव, सदस्या भावना लोणारे, अनिल गेंडरे, माधुरी ठाकरे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता राजू रहाटे, गिरिश वासनिक, श्री रंगारी, लीना बुधे यांच्यासह स्लम विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये रमाई घरकुल योजनेच्या कामकाजाचा आढावा सभापतींनी घेतला. कागदपत्रांच्या अभावामुळे प्रक्रिया करण्यास उशीर होतो आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आसीनगर झोनमधील नऊ लाभार्थ्यांना यावेळी सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आला. यामध्ये भाऊराव जांभूळकर, अजय कोकाटे, राकेश रामटेके, श्री.मेश्राम, श्री.डोंगरे यांचा समावेश आहे. प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश सभापती श्रीमती यादव यांनी दिले.
झोपडपट्टीवासियांना पट्टे वाटपासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. महराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार २०११ पूर्व अतिक्रमित झालेल्या झोपडपट्टीधारकांना स्थायी पट्टा देण्याचे आदेश आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात २०११ पूर्वी पासून येणाऱ्या झोपडपट्ट्यांचे सर्वक्षण करून त्यांना स्थायी पट्टा देण्याचे कार्य सुरू आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि नझुल अशा तीन संस्थाच्या मालकीच्या जागेवर झोपडपट्टा आहे. या सर्व झोपडप्ट्ट्यांचे सर्वेक्षणाचे काम नागपूर महानगरपालिकडे असून तीन वेगवेगळ्या संस्थेमार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजनेचा लाभ नागरिकांपर्यंत पोहचेल, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश सभापती तारा (लक्ष्मी) यादव यांनी दिले.