मनपा आयुक्तांचे निर्देश : खड्ड्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासन गंभीर
नागपूर : नागपूर महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या रस्त्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ही मनपाचीच आहे. खड्डे पडले की ते तातडीने बुजविणे हे यंत्रणेचे काम आहे. जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. या कर्तव्यात कुठलीही कसूर खपवून घेणार नाही. सध्या असलेले खड्डे एक आठवड्यापर्यंत बुजवून त्याचा अहवाल द्या, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिला.
मनपा आयुक्तांनी शहरातील खड्ड्यांचा विषय गांभीर्याने घेत मंगळवारी (ता. २४) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीला मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अमीन अख्तर, अरविंद बाराहाते, नरेश बोरकर, आसाराम बोदिले, विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांच्यासह सर्व झोनचे उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
खड्ड्यांच्या विषयांचे गांभीर्य सांगत आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले, खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होऊ शकतात. कुठल्याही रस्त्यांवर खड्डे पडणे आणि ते वेळीच न बुजविणे हे यंत्रणेचे अपयश आहे. पावसाळ्यात रस्त्यांत खड्डे पडूच नये, याची काळजी का घेतली जात नाही, असा सवाल करीत आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांत सर्व खड्डे बुजवून तो अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.
खड्डे बुजविण्यासाठी महानगरपालिकेकडे पुरेशी यंत्रणा आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांचे कामे हाती घेण्याआधी किंवा अन्य कुठलेही नवे काम सुरू करण्याअगोदर जे रस्ते आहेत, त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्याला प्राधान्य द्या. मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टच्या माध्यमातून पुढील सात दिवसात खड्डे बुजविणे शक्य नसेल तर नागपूर सुधार प्रन्यासच्या हॉट मिक्स प्लान्टची मदत घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले. दिलेल्या मुदतीच्या आत हे कार्य झाले नाही तर संबंधित अधिकाऱ्यावर त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी उपस्थिती अधिकाऱ्यांनी अन्य विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची माहिती आयुक्तांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या गोरेवाडा लगतच्या रिंगरोडवर, मेट्रोचे कार्य सुरू असलेला वर्धा रोड, कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू रोड तसेच वीज कंपनीचे कार्य सुरू असलेल्या सेंट्रल एव्हेन्यू रोड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्य सुरू असलेल्या पारडी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मनपाअंतर्गत असलेल्या भांडेवाडी येथेही पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यावरही पुनर्भरणाची प्रक्रिया योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर संबंधित विभागांना आपण पत्र पाठविले असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. रस्ते खोदल्यानंतर त्याचे पुनर्भरण योग्य होत नसेल तर त्यांना नोटीस देणे आणि ते करवून घेण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. त्यामुळे स्वत: अधिकाऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. पूर्वीचे काम पूर्ण झाल्याशिवाय किंवा योग्य पुनर्भरण झाल्याशिवाय नव्याने खड्डे खोदण्याची परवानगी देऊ नये, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.