मुद्गल यांची तडकाफडकी बदली : प्रशासनात चर्चांना उधाण
नागपूर : जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल (Ashwin Mudgal collector nagpur) यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे (Ravindra Thakare) यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर मुद्गल यांनी बदली करण्यात आल्याने प्रशासनात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. भंडाराचे जिल्हाधिकारी पदावरी नाशिकचे विभागीय आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्रण यांनी नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांची बदली झाल्याची चर्चा आज सकाळपासून होती. सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास हे आदेश धडकले. अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर बदली करण्यात आली. अतिरिक्त विभागीय आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार नरेगाचे आयुक्त ए.एस.आर. रंगा नायक यांच्याकडे होता.
ही जागा रिक्त असल्याने मुद्गल यांची बदली रिक्त जागे करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार नाना पटोले यांनी त्यांच्या 50 वर तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारीचा भाग वगळता निवडणुकीत मुद्गल यांचे काम उत्तम असल्याचे सांगण्यात येते. अनेक नवीन उपक्रम त्यांनी राबविले.
असे असतानाही अर्ज स्वीकारण्याची अधिसूचना निघाल्यानंतर बदली केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीकरता मुद्गल यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या प्रयत्नामुळेच मतदार नोंदणीचा टक्का वाढला.
जिल्हाधिकारी पद केले अवनत
रवींद्र ठाकरे महाराष्ट्र सेवाचे अधिकारी आहेत. त्यांना दीड वषापूर्वी भारतीय प्रशासक सेवेत पदोन्नती देण्यात आली. त्यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पदावर कार्य केले आहे. त्यांच्याकडे मदत डेअरी आणि वनामतीचाही प्रभार होता. वर्षभरापूर्वी महानगर पालिका येथे अतिरिक्त आयुक्त पदावर त्यांनी नियुक्ती करण्यात आली होती.
आता त्यांना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून ठाकरे यांची बदली करण्यात येत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढलेल्या आदेशात नमूद आहे. ठाकरे यांनी सांयकाळच्या सुमारास पदभारही स्वीकारला.
एम.जे. प्रदीपचंद्रण भंडारा जिल्हाधिकारी
भंडाराच्या जिल्हाधिकारी पदावर नाशिकचे अतिरिक्त विभागीय आयुक्त एम.जे. प्रदीपचंद्रण यांची नियुक्ती करण्यात आली. तर भंडाराचे जिल्हाधिकारी डॉ. गिते यांना मात्र पोस्टींग देण्यात आली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील एका विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. त्यामुळेच गिते यांच्या प्रदीपचंद्रण यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदीपचंद्रण “कडक’ अधिकारी असल्याचे सांगण्यात येते.
मुद्गल यांची होणार पुन्हा बदली?
मुद्गल हे वरिष्ठ श्रेणीचे अधिकारी आहेत. अतिरिक्त विभागीय आयुक्त हे पद त्यांच्या श्रेणीच्या तुलनेत कनिष्ट असल्याचे सांगण्यात येते.
ही नियुक्ती एक प्रकारे त्यांना शिक्षा असल्याची चर्चा आहे. तर विभागात हेच पद रिक्त असल्याने तडकाफडी त्यांना नियुक्ती देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यांचे काम उत्तम असल्याने त्यांनी लवकरच येथून बदली होणार असल्याचे बोलल्या जात आहे.