एक हजार मुलांमागे ९६८ मुली : पीसीपीएनडीटी बैठकीत माहिती सादर
नागपुर: नागपूर महानगरपालिकेतर्फे लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या जनजागृती अभियानाला यश येत असल्याचे दिसून येत आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी (ता. २६) मनपा मुख्यालयातील उपसंचालक (आरोग्य) यांच्या कक्षात पीसीपीएनडीटी अंतर्गत झालेल्या जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.
मुलींचे जन्मदर कमी होण्यामागे समाजातील मानसिकता जबाबदार आहे. शहरात लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी जनजागृती केली जाते. सर्व डॉक्टर्सचे प्रशिक्षणही घेण्यात येते. याशिवाय सोनोग्रॉफी करणाऱ्या डॉक्टर्सचेही प्रबोधन करण्यात येते. त्याचेच फलित म्हणून शहरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या सन २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहरात एक हजार मुलींमागे ९२६ एवढे मुलींचे प्रमाण होते तर जानेवारी २०१९ ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपुरात एक हजार मुलींमागे ९६८ एवढे जन्मदराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली. हे केवळ शहरातील सोनोग्राफी सेंटर व गॉयनॅकॉलॉजी सोसायटीच्या सकारात्मक भूमिकेमुळे शक्य झाले असल्याचे सांगत सर्वप्रथम त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीमध्ये ठेवण्यात आला.
यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे म्हणाल्या, शहरामध्ये पीसीपीएनडीटी नियमांचे व्यवस्थित पालन केले जाते. शिवाय मनपाच्या डॉक्टर्सतर्फे दर तीन महिन्यांनी शहरातील सोनाग्रॉफी केंद्राला भेट देऊन तपासणीही केली जाते. मुलींचा वाढलेला जन्मदर हे त्याचेच यश असल्याचे त्यांनी सांगितले. सोनोग्राफी मन्शीन्सना एमआरसी क्रमांक देण्यात येतो. पीसीपीएनडीटी अंतर्गत नोंदणी असलेल्या शहरातील एकूण ७९२ सोनोग्राफी मशीन्सना एमआरसी क्रमांक देण्यात येत आहे. यामध्ये ७२३ सोनोग्रॉफी उपकरणे तरे १७ एमआरआय, ४३ सीटी स्कॅन, ९बी स्कॅन या उपकरणांचा यात समावेश आहे. शहरातील मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढणे ही आनंददायी बाब आहे. सामाजिक मानसिकता बदलत असल्याचे यावरून दिसून येत आहे. तसेच मुलींच्या जन्माचे स्वागतदेखिल व्हायला लागले आहे. मात्र शहरातील सोनोलॉजिस्ट, स्त्री रोग तज्ज्ञ यांनीही सजग राहणे आवश्यक आहे. कुणीही लिंगनिदान करू नये व इतरत्र कुठेही होऊ नये, याची सर्वांनी जबाबदारीने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले.
एखादा डॉक्टर सोनोग्रॉफी करुन गर्भातील लिंग चाचणी करुन मुलगा किंवा मुलगी असल्याचे सांगत असल्यास त्याचे नाव विभागाला कळवावे. ते सिद्ध झाल्यास माहिती देणाऱ्याला शासनातर्फे एक लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय डिकॉय केस यशस्वी झाल्यास शासनातर्फे २५ हजार रुपये व डॉक्टर्सच्या आय.एम.ए. संस्थेतर्फेही बक्षीस देण्यात येते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीमध्ये नवीन सोनोग्राफी सेंटरसाठी आलेले सात अर्ज सादर करण्यात आले होते. त्यापैकी तीन अर्ज कागदपत्रांअभावी नाकारण्यात आले. त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून पुढील बैठकीत अर्ज सादर करावे, असे निर्देश सल्लागार समितीने दिले. सोनोग्राफी सेंटर नूतनीकरणासाठी पाच अर्ज प्राप्त झाले होते. याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
बैठकीत विधी अधिकारी व्यंकटेश कपले यांनी सुचविले की, पीसीपीएनडीटीचईया कायद्याचे व्यवस्थितरीत्या पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा छोट्या-छोट्या चुकांमुळे न्यायालयात केसदेखिल दाखल होऊ शकते. कायद्याची संपूर्णपणे पूर्तता करावी, अन्यथा कारवाईदेखिल होऊ शकते.
उपसंचालक (आरोग्य) तथा पीसीपीएनडीटीच्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा ढवळे, डॉ. चैतन्य शेंबेकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. संजय मराठे, रेडीओलॉजीस्ट डॉ. प्रशांत ओंकार, वीणा खानोरकर, डॉ. कीर्तीदा अजमेरा, डॉ. वासंती देशपांडे, मनपाचे विधी अधिकारी व्यंकटेश कपले, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस प्रामुख्याने उपस्थित होते.