.
नागपूर : महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी अनेक कठोर कायदे करण्यात आलेत आणि कायद्यात नवीन सुधारणाही करण्यात येत आहेत. मात्र महिलांवरील अत्याचार कमी होण्यास नाव घेत नाही. अगदी चिमुकल्यांपासून तर वयोवृद्ध महिलांनापर्यंत कुणीही सुरक्षित नाही. यासाठी मुलींनी कराटे, कुंफू या माध्यमाने स्वरक्षण करण्याचा ध्यास घेतला आहे. असेच आत्मरक्षणाचे धडे गिरवत नागपुरातील ११ वर्षाच्या मुलीने तब्बल १२ पदकांची कमाई केली आहे. यज्ञा संजय पवार असे त्या कराटेपटू मुलीचे नाव आहे.
भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स द्वारा संचालित नेहरू युवा केंद्र औरंगाबाद व एशियन शिटो-आर.वाय.यू स्पोर्ट्स कराटे डिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या शिटो-आर.वाय.यू ओपन कराटे चॅम्पियनमध्ये यज्ञा पवारने सुवर्ण पदकाला गवसणी घालत नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यज्ञा पवार सेंट झेवियर्स हायस्कूल, हिंगणा येथील ६ व्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती प्रशिक्षक विशाल डोंगरे यांच्या मार्गदर्शनात काता व कुमीते (कराटे) प्रकारात धडे गिरवत आहे. यज्ञाने वयाच्या पाचव्या वर्षांपासून कराटेची सुरुवात केली. तिचे काका सुशील पवार यांनी तिला कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करण्याच्या व आत्मरक्षणाच्या उद्देशाने एका खासगी वर्गात कराटे क्लास लावून दिले. यातूनच तिला पुढे कराटेची आवड निर्माण झाली आणि यज्ञा आज तब्बल ९ सुवर्ण तर ३ रौप्य असे एकूण १२ पदकाची मानकरी आहे.
कराटेमुळे स्वरक्षणाचे बळ मिळते, नवीन एनर्जी मिळते असे म्हणणारी यज्ञा पवारने आतापर्यंत अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. गत महिन्यात मुंबई येथे झालेल्या आंतराष्ट्रीय स्पर्धेत तिच्या वयाच्या प्रतिस्पर्धी स्पर्धक न मिळाल्याने आयोजकांनी तिला राष्ट्रीय स्पर्धेतस्थान दिले. यात यज्ञाने काता व कुमीते या दोन्ही प्रकारात क्रमशः सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. यावेळी देश विदेशातील १० हजार स्पर्धक सहभागी झाले होते. तर औरंगाबाद येथे झालेल्या स्पर्धेत १४०० स्पर्धक होते. यातून यज्ञाने बाजी मारली. यापूर्वी तिने विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकाविले आहेत. तिने आपल्या यशाचे श्रेय आई प्रतिभा व वडील संजय पवार यांना दिले.
यज्ञाच्या यशाबद्दल शाळेचे संचालक डॉ. ए.एफ. पिंटो, मॅनेजिंग डायरेक्टर ग्रेस पिंटो, प्राचार्या शशिकला धोटेकर, प्रशिक्षक विशाल डोंगरे आदींनी अभिनंदन केले आहे.