नागपूर– गरीब रथ एक्स्प्रेसमध्ये शनिवारी मिळालेल्या बॉम्बच्या सूचनेनंतर आज रविवारी पुन्हा गाडीची झाडाझती घेण्यात आली. सायंकाळी करण्यात आलेल्या तपासणीत एका डब्यात काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. आत बॅटरी असल्याने मेटल डिक्टरने धोक्याची सूचना दिली आणि एकच खळबळ उडाली. तपासणी सुरू असताना पुन्हा एका डब्यात लाल रंगाची थैली बेवारस आढळली. बीडीडीएस पथकाने सावगिरी बाळगून तपासणी केली. मात्र, दोन्ही बॅगमध्ये आक्षेपार्ह साहित्य नसल्याचे निष्पन्न झाल्याचे स्पष्ट होताच तपास पथक आणि प्रवाशांनी सुटेचा श्वास सोडला.
पुणे-नागपूर गरीबरथमध्ये बॉम्ब असल्याची सूचना शनिवारी सायंकाळी मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. आरपीएफ व जीआरपीच्या पथकांनी तपासणी सुरू केली होती. नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री ८.४४ वाजता आलेल्या चेन्नई – हजरत निजामुद्दीन गरीबरथची झाडाझडती घेण्यात आली. तिकडे १२११३ पुणे -नागपूर गरीबरथची वाटेत ठिकठिकाणी तपासणी करण्यात आली.
ही गाडी रविवारी सकाळी नागपुरात पोहचताच पुन्हा तपासणी करण्यात आली. तर सायंकाळी १२११४ नागपूर -पुणे गरीबरथ एक्स्प्रेस फलाट क्रमांक ४ वर पोहचताच पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली. जीआरपी व आरपीएफच्या वेगवेगळ्या बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात येत होती.
दरम्यान एका डब्यात काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. आत बॅटरी असल्याने मेटल डिक्टरने धोक्याची सूचना दिली आणि एकच खळबळ उडाली. सावधपणे बॅगची तपासणीकरण्यात आली. आत स्फोटकं नसल्याचे स्पष्ट होताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याचवेळी बॅगचा मालकही पोहचला.
पुढे तपासणी सुरू असताना एका डब्यातील प्रवाशांनी लाल रंगाची थैली बेवारस अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे तपासणी पथक सतर्क झाले. यावेळी प्रवासीही भयभित झाले. पथकाने सावधगिरी बाळगून तपासणी केली. त्यातही काहीच आक्षेपार्ह साहित्य मिळाले नाही.