विशाल मुत्तेमवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर : राज्य सरकारच्या विविध पदभरतींच्या परीक्षा सध्या ‘महापरीक्षा पोर्टल’च्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मात्र, या ‘महापरीक्षा पोर्टल’मध्ये अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे हे‘महापरीक्षा पोर्टल’ तत्काळ बंद करून अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विशाल मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
२०१७ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने विविध शासकीय विभागांतील पदभरती करण्याची जबाबदारी ‘महाआयटी’कडे सोपवली होती. या विभागाने ‘महापरीक्षा पोर्टल’ची निर्मिती करून त्या माध्यमातून विविध पदभरतींच्या परीक्षा घेणे सुरू केले. त्यापैकी वनविभाग, महसूल विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या; तर पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास विभाग आदींच्या परीक्षा व्हायच्या आहेत. मात्र घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये गैरहजर असलेल्या उमेदवाराचे नाव अंतिम गुणवत्ता यादीत येणे, विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र स्थानिक जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यात देणे, चुकीच्या प्रश्नांना सरसकट गुण बहाल करणे, परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकार घडणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था योग्य नसणे, डमी उमेदवारांद्वारे परीक्षा देणे, सॉफ्टवेअरमध्ये अचानक बिघाड होणे असे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत.
महापरीक्षा पोर्टलवरील परीक्षा ही २० ते २५ दिवस चालते. त्यामध्ये प्रत्येक दिवशी परीक्षेचे स्वरूप बदलतेच. परंतु, प्रत्येक शिफ्टलादेखील परीक्षेचे स्वरूप बदलते. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला निश्चितपणे परीक्षेचे स्वरूप कळत नाही. अशा वेळी जास्तीत जास्त गुण मिळविणे अवघड जाते. परंतु, असे असतानाही निकाल मात्र अविश्वासजनक लागताना दिसतो.
भरतीमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व भरती एमपीएससीद्वारे करावी, अशी राज्यातील सर्वच तरुणांची मागणी आहे. त्यानुसार त्यांनी वेळोवळी राज्यभर आंदोलनेही केली. परंतु, तत्कालीन राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. महापरीक्षा पोर्टलवरून भरती परीक्षा घेताना अनेकवेळा गैरप्रकार झाल्याचे आढळले. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून नोकरी न मिळाल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे महापरीक्षा पोर्टलविरोधात प्रचंड असंतोष पाहावयास मिळतो.
यापूर्वी २०१७ मधील कृषी सहायक पदाची परीक्षा, २०१८ मधील नगर परिषद भरती व राज्य गुप्तवार्ता भरती प्रक्रिया, २०१९ मध्ये ग्रामविकास विभागासाठी भरती परीक्षा व वनविभागातील भरती परीक्षेचा गोंधळ उघडकीस आला आहे. येणाऱ्या काळात शासकीय भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. याअंतर्गत पोलीस विभाग, ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, पशसंवर्धन विभाग आदी विभागांमध्ये भरती होणार आहे. वनविभाग तसेच तलाठी परीक्षेत झालेला गोंधळ लक्षात घेता आगामी काळात होणाऱ्या परीक्षा ऑफलाईन, तसेच पारदर्शक पद्धतीने राबवून अभ्यासू व प्रामाणिक उमेदवारांना न्याय द्यावा, असे मुत्तेमवार यांनी पत्रात नमूद केले आहे.