‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह यांचे आवाहन
नागपूर: कोरोनाविरुद्ध लढताना प्रतिकारशक्ती उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी व्हिटॅमीन सी, डी आणि झिंक औषधे दिली जातात. मात्र ही औषधे आपण जास्त वेळ खाउ शकत नाही. सुरूवातीला आपल्याला कोरोनापासून बचाव हाच उपाय असल्याचे सांगितले जायचे. मात्र आताची परिस्थिती पाहता कोरोनासोबतच जगायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे अत्यावश्यक आहे. यासाठी रोजच्या आहारात लिंबु, आवळा, मोसंबी, द्राक्षे अशी लिंबुवर्गीय फळे घ्या. याशिवाय नियमित व्यायाम करा, असा सल्ला केविन्स फिजिओथेरेपी अँड स्पोर्ट्स इंज्युरी क्लिनिकचे डॉ. केविन अग्रवाल आणि कन्सल्टन्ट इंटेन्सिव्हिस्ट डॉ. उत्कर्ष शाह यांनी दिला.
महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या ‘फेसबुक लाईव्ह’ कार्यक्रमात सोमवारी (ता.२८) डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह यांनी मार्गदर्शन केले व नागरिकांच्या शंकांचे निरसरण केले.
आज कोव्हिडनुसार आपल्याला आपली जीवनशैली विकसीत करायची आहे. यासाठी सर्वात आधी प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याकरिता व्हिटॅमीन सी आणि डी करीता लिंबुवर्गीय फळे खा, झिंक करिता सुकामेवा खा. याशिवाय लवकर झोपा आणि लवकर उठा. नैसर्गिक बाबींचा आपल्या जीवनशैलीत अंगीकार करा. मास्कला जीवनावश्यक भाग बनवा. मास्कचा योग्यप्रकारे वापर करा. नियमित हात धुवा, सॅनिटायजरचा वापर करा. मधुमेह, उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा. कोरोनानंतर अनेकांना अशक्तपणा येतो.
यासाठी फिजिओथेरेपीची महत्वाची भूमिका आहे. कोव्हिड बाधित रुग्णांमध्ये अतिशय जास्त अशक्तपणा असल्याने त्यांनी कठीण व्यायाम करू नये. खुर्चीवर बसणे आणि उभे राहणे, घरातच चालणे असे सोपे व्यायाम करावे. प्रत्येकच रुग्णाला फिजिओथेरेपीची गरज नाही. त्यामुळे यासबंधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन डॉ. केविन अग्रवाल आणि डॉ. उत्कर्ष शाह यांनी केले.