नागपूर: केंद्रीय गृह निर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेनद्वारा ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ या संकल्पनेस अनुसरून राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ मंगळवारी (ता:१७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
अभियानातील भव्य रांगोळी मेकिंग उपक्रमा अंतर्गत ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ याचे महत्व विशद करणारी आकर्षक बोलकी सुबक आणि “२६ बाय २०” फूट आकाराची भव्य रांगोळी मनपा मुख्यालयातील दालनात साकारण्यात आली असून, आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी रांगोळीचे कौतुक केले. तसेच “स्वच्छता दौड” च्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, श्री. मिलिंद मेश्राम, डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह कलावंत श्री. दीपक पचांग, श्रीमती सोनाली पचांग व इतर अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार शहरात ‘स्वच्छता ही सेवा २०२४’ अभियान राबविण्यात येत असून, आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत, अभियानात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
नागपूर महानगरपलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात मनपाच्या दहाही झोन निहाय हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत स्वच्छतापूरक जीवनशैली अंगिकारुन आणि स्वच्छतेला सांस्कृतिक मूल्य म्हणून महत्त्व दिले जाणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार आज मनपा मुख्यालयात भव्य रांगोळी मेकिंग उपक्रम घेण्यात आला. तसेच “स्वच्छता दौड” या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.
30 तासांच्या अथक मेहनतीने साकारली रांगोळी
मनपा मुख्यालयातील दालनात ‘स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता’ चे महत्व सांगणारी आणि स्वच्छता ही सेवा संकल्पनेची माहिती देणारी बोलकी सुबक रांगोळी कलावंत श्री. दीपक पचांग, श्रीमती सोनाली पचांग यांनी साकारली. २६ बाय २० फूट आकाराची आकर्षक रांगोळी साकारण्यासाठी श्री. दीपक पचांग, श्रीमती सोनाली पचांग यांना 30 तासांचा वेळ लागला. सोमवार १६ सप्टेंबरला सकाळपासून दोघांनी रांगोळी साकारण्याचे कार्य सुरु केले. व मंगळवारी दुपारी ही रांगोळी पूर्णत्वास आली. रांगोळीचा बोलकेपणा बघून समस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कलावंताचे कौतुक केले.