मुंबई : रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय अनाऊंसर, निवेदक आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. अमीन सयानी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील एच.एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
दरम्यान रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्ष त्यांच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ ने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अमीन सयानी यांना १९५२ मधील गीतमाला शोमधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. त्यावेळी हा नंबर वन शो होता. १९५२ ते १९९४ पर्यंत या शो ने प्रेक्षकांच्या मनावर राज केले. नंतर २००० ते २००१ आणि २००१ ते २००३ पर्यंत काही बदल करुन शो पुन्हा टेलीकास्ट करण्यात आला होता.