नागपूर : जीव माणसाचा असो किंवा पक्ष्याचा,असतो अनमोलच.. अशाच एका पक्षाला त्रिमूर्ती नगर अग्निशमन केंद्रातील पथकाने जीवनदान दिले. प्रताप नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या स्वालंबी नगर येथील संचयनी अपार्टमेंट येथील एका झाडावर मांजात अडकलेल्या एका कबुतर पक्षाचे रेस्क्यू करून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
माहितीनुसार,स्वालंबी नगर येथील रहिवासी सचिन शेंडे यांना आज २२ फेब्रुवारीला ११.३० वाजताच्या सुमारास परिसरातील एका झाडावर कबुतर पक्षी मांजात अडकलेला दिसला. हा पक्षी मांजात अडकून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता.
सचिन शेंडे यांनी तत्परता दाखवत त्रिमूर्ती नगर येथील अग्निशमन विभागात कॉल केला.यानंतर केंद्रातील अधिकारी सुरेश बी आत्राम,सव्वालाखे आणि धोटे हे गाडी क्रमांक एम एच ३१ डी एस ४९३० घेऊन घटनास्थळी पोहोचले.अथक प्रयत्नानंतर मांजात अडकलेल्या कबुतराचे त्यांनी रेस्क्यू केले.