पाटणा: बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाचे (रालोजपा) राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस यांनी आता एनडीएचा हात सोडल्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आमचा आणि एनडीएचा आता कोणताही संबंध उरलेला नाही.
रालोजपाच्या एका कार्यक्रमात पारस यांनी हे मोठे वक्तव्य करत एनडीएतील जुन्या सहकार्याला पूर्णविराम दिला. त्यांनी सांगितले की, २०१४ पासून आम्ही एनडीएसोबत होतो. पण प्रत्येक निवडणुकीत आमच्यावर अन्याय झाला. आमचा पक्ष दलित समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि आम्हाला सतत दुर्लक्षित केले जाते.
नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड-
पशुपती पारस यांनी नितीशकुमार सरकारवरही जोरदार टीका केली. “बिहार सरकार दलितविरोधी आहे. त्यांनी आम्हाला कधीच न्याय दिला नाही. राज्यातील सरकार आणि केंद्रातील यंत्रणा दोघंही भ्रष्ट आहेत,” असे आरोप त्यांनी केले.
महाआघाडीकडे झुकण्याचे संकेत-
पारस यांनी संकेत दिले की, जो पक्ष आमचा सन्मान करेल, त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाण्याचा विचार करू. जर महाआघाडीकडून योग्य सन्मान मिळाला, तर भविष्यातील युतीसाठी खुले आहोत.
रामविलास पासवान यांना भारतरत्न देण्याची मागणी-
या कार्यक्रमात त्यांनी दिवंगत नेते आणि आपल्या भावंड रामविलास पासवान यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणीही केली. “त्यांचे योगदान मोठे आहे, आणि त्यांना सर्वोच्च सन्मान मिळावा,” असे ते म्हणाले.
स्वबळावर निवडणुकीची तयारी-
रालोजपा राज्यातील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटन मजबूत करून निवडणुकीची तयारी करणार आहे. “आमचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन जनतेशी संवाद साधतील. आम्ही कोणत्याही युतीशिवाय, स्वबळावर निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे पारस यांनी ठणकावून सांगितले.या निर्णयामुळे बिहारच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.