नागपूर : अमरावतीच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर मैत्री करत नागपुरातील कामठी येथे राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत तिचे लैंगिक शोषण केले.तिने आरोपी तरुणाला लग्नाची मागणी केली असता तिला मारहाण केली. तसेच बदनामी करण्याची धमकी देऊ लागला.
पीडितेने पोलिसात तक्रार केली. फरजान गफ्फूर शाह (२९) रा. अमरावती, असे आरोपीचे नाव आहे. तहसील पोलिसांनी २० वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला.
माहितीनुसार,आरोपी तरुणाने २०१९ मध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून पीडित तरुणीशी मैत्री केली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. फरजान हा तरुणीला भेटण्यासाठी नागपूरला येत होता. तहसील ठाण्यांतर्गत एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेत होता. यादरम्यान त्याने लॉजमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. जानेवारी महिन्यात तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता फरजानने स्पष्ट नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद होऊन फरजानने तरुणीला मारहाण केली.
पुन्हा संपर्क केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. अखेर तरुणीने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा फरजानविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.