नागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या अभावामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनपा मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. यादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यालयात ठेवल्या मटके फोडले.
तसेच अनेक वस्तूंची तोडफोड केली. तसेच मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या कृत्यावर महापालिकेने कडक भूमिका घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या आंदोलन व्हिडिओही समोर आला आहे ज्यामध्ये महानगरपालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर ठेवलेल्या फुलांच्या कुंड्यांची तोडफोड केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे सदर पोलिसांनी वसीम लाला, प्रमोद ठाकूर, ओम तिवस्कर, समीर राय, मिलिंद दुपारे, लंकेश उके यांच्याविरुद्ध सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.