नागपूर: देशात आजपासून तीन नवीन फौजदारी कायदे (New Criminal Laws) लागू झाले आहेत, जे भारताच्या गुन्हेगारी न्याय व्यवस्थेत दूरगामी बदल घडवून आणतील.याअंतर्गत नागपुरात या नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील वाठोडा पोलीस स्टेशमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यानुसार पाहिला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाठोडा येथे अप क्र.384/24 कलम 281,125(ब) BNS प्रमाणे गंभीर अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशमध्ये, अंबाझरी, पो. स्टेशन आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन आणि अजनी पोलीसमध्ये पोलिसांनी भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 194 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वाठोड्यात नवीन कायद्यानुसार अपघाताचा गुन्हा दाखल –
वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवनपुत्र नगर, सिम्बॉयसिस कॉलेज रोडने पायदाळ जात असताना भरधाव टाटा एस गाडीने एकाला धडक दिली. यात इसम गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.मुर्तुजा बशीर अहमद अन्सारी( वय ३५ वर्षे, रा. वांजरा, बिलाल नगर, कळमना) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. या प्रकरणी पिडीत व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरुन वाठोडा पोलिसांनी कार चालका विरोधात कलम २८१, १२५ (ब) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास सुरू केला आहे. एमआयडीसीतही गुन्हा दाखल – भारतीय नागरीक सुरक्षा संहीता कलम १९४ अन्वये पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत पहील्या अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रभाग क. ८, दत्तमंदीर जवळ, वानाडोंगरी, नागपुर येथे राहणारे फिर्यादीचे वडील नामे चरण उध्दवराव साखळे(वय ६१ वर्षे) हे कुलर मध्ये पाणी भरत असतांना त्यांना कुलरचा करंट लागल्याने ते बेशुध्द झाले. त्यांना नातेवाईकांनी उपचाराकरीता शालीनीताई मेघे हॉस्पीटल, वानाडोंगरी येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी गून्हा दाखल करून पुढील तापस सुरू केला आहे.
अजनी पोलीस स्टेशनमध्येही नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल –
अजनी पोलीस ठाण्याच्या लोहारा समाज भवन परिसराजवळ एका वर्षाच्या चिमुरडीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी भारतीय नागरी संरक्षण संहितेच्या कलम 194 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान नागपूर पोलीस मुख्यालयाने पोलीस अधिकाऱ्यांना जुन्या कायद्यांकडून नवीन कायद्यांकडे जाण्यासाठी माहिती पुस्तिका दिली आहे. यासोबतच पोलिसांना एक एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात आली आहे. यात गुन्हेगारी, महिला व बालकांविरुद्धचे गुन्हे, मालमत्तेचे गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित गुन्हे, दहशतवादी कारवाया आणि अपघातांना कसे सामोरे जावे याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भारतीय नागरी संहिता (BNS) 2023, भारतीय नागरी संरक्षण संहिता (BNSS) 2023 आणि भारतीय पुरावा कायदा (BSA) 2023 या तीन कायद्यांनी अनुक्रमे ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतली आहे.