मुंबई : मोनॅको या देशात २६ व २७ जून रोजी होणाऱ्या ग्रीन एनर्जी फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण आज मोनॅकोच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
वर्षा निवासस्थानी चेंबर ऑफ रिन्युबल एनर्जी अॅण्ड इकोलॉजी ऑफ मोनॅकोचे अध्यक्ष एरीक व्हिलोकोन्झां व अन्य दोन सदस्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी ग्रीन एनर्जीचे सदस्य सुरज ठाकुर उपस्थित होते.
जून महिन्यात होणाऱ्या या ग्रीन एनर्जी फोरममध्ये पन्नासहून अधिक देश सहभागी होणार आहेत. त्यामध्ये येणाऱ्या काळातील ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने व उपाय यावर वैचारिक मंथन होणार असल्याचे एरीक व्हिलोकोन्झा यांनी सांगितले.
यावेळी मोनॅको देशातील उर्जा निर्मिती, ऊर्जा व्यवस्थापन, जल प्रकल्पावर आधारित विद्युत निर्मिती, वीज प्रदूषणाच्या अनुषंगाने उपाययोजना याबाबतीचे संक्षिप्त सादरीकरण या शिष्टमंडळाने केले. पारंपरिक व नवीकरणीय ऊर्जा, सौर ऊर्जा या संबंधी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.