नागपूर : देशाचे आर्थिक सर्व्हेक्षन सादर करताना कोव्हीड-१९ मुळे उत्पन्नात घट झाली असल्याचे मान्य करणाऱ्या देशाच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांचा पाऊस पाडणारा कोरडा दिलासा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केली आहे.
जर एकुण उत्पन्नातच घट झाली असेल तर घोषणा पूर्ण करणारा निधी आणणार कुठून ? शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण करणार कशी ? आणि सिंचन योजना पूर्ण करण्याचे स्वप्न साकारणार कसे हा महत्वाचा प्रश्न आहे. शेती उत्पादनाच्या खर्चावर आधारीत भावापेक्षा ५० टक्के अधिक भावाने शेतकऱ्यांचा माल खरेदी करू असे आश्वासन देऊन भाजपने सत्ता काबीज केली.
आधी अडीच पट भाव कमी केला अन आता दीड पट भाव वाढवू म्हणतात यावर शेतकऱ्यांनी कसा विश्वास ठेवायचा ? असा सवालही राजेंद्र मुळक यांनी केला आहे. एकीकडे इंडियाची व आत्मनिर्भर घोषणा करणारे हे सरकार दुसरीकडे एफ.डी.आय . ला प्रोत्साहान देत आहे.
नोकरदार वर्गाला कोणताही दिलासा न देणारे भांडवलदारांना मात्र भरीव सूट देत आहेत. जे दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होते ते बेरोजगारी वाढवत आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडणारा हा कोरडा अर्थसंकल्प असल्याचे राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केले आहे.