नागपूर : शहरातील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे बोधन करण्यासाठी, त्यांना गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर करण्यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने नागपूर कारागृहात किर्तनाचे आयोजन करण्यात आले . वारकरी आचारसंहिता परिषदेचे मुख्य प्रवर्तक ह.भ.प. निलेश महाराज झरेगांवकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला.
अनेक संतांनी शेकडो वर्षांपासून पंढरीच्या विठू रायाचे गुणगाण गाण्यासाठी, भक्तीचा प्रसार करण्यासाठी तसेच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी याचा उपयोग केला. आजदेखील राज्याच्या प्रत्येक गावात चार वारकरी एकत्र येऊन भजन कीर्तन करतात. यामुळे अनेकांनी भक्तीचा मार्ग धरला आहे. आता हा कीर्तनाचा गजर कारागृहातदेखील करण्याचा निर्णय निलेश महाराज झरेगांवकर यांनी घेतला आहे. त्यांनी सोप्या भाषेतून अध्यात्माचा मार्ग बंदीवांनासाठी मोकळा करून दिला. ‘भक्तीमार्गाने अध्यात्मिक उन्नती साधता येऊ शकते व प्रापंचिक दुःखावर मात करता येवू शकते, असे कैद्यांना सांगितले.
या कीर्तन सोहळ्याला डॉ. पंकज महाराज गावडे आणि प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच कारागृहाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता व विशेष पोलिस महानिरीक्षक जर्नादन सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संचालन विजय जथे व पंचशीला चव्हाण यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी कारागृह अधीक्षक वैभव आगे, उपअधीक्षक दीपा आगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी आनंद पानसरे, नरेंद्रकुमार अहिरे, श्रीधर काळे, तुरुंगाधिकारी दयावंत काळबांडे, अमोल वानखडे, भगवान मंचरे, हवालदार राजू हाते, संजय तलवारे, विजय रघते, सतीश भराड, किशोर पडाळ, संजय गायकवाड, प्रमिला शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या मीना लाटकर, कृष्णा पाडवी, कारागृह शिक्षक लक्ष्मण साळवे आदींनी परिश्रम घेतले.