नागपूर : राज्य सरकारने शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी मोठे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. हा पॅटर्न येत्या 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्याच्या उद्देशाने सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात विधानपरिषदेत माहिती दिली.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने या निर्णयासंदर्भात अधिकृत प्रक्रिया सुरू केली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी सांगितले की, राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) सीबीएसई अभ्यासक्रम स्वीकारला जाणार आहे. यासाठी सुकाणू समितीने पाठ्यक्रमाच्या आराखड्याला मान्यता दिली आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, यासाठी सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीतही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात 1 एप्रिल 2025 पासून होईल. राज्यातील शाळांमध्ये हा पॅटर्न प्रभावीपणे लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सरकारने दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. या बैठकीत त्यांनी शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्राला पुन्हा शैक्षणिक आघाडीवर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे निर्देश दिले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करावा, परंतु त्यात राज्याच्या गरजेनुसार आवश्यक बदल करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी कार्ययोजना तयार केली आहे. शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.