नागपूर: शहरातील कळमना परीसरात स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधम बापाला नागपूर विशेष सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्दयी बापाने आपल्या पोटच्या पोरीला फाशीचा बनाव करण्याचे सांगून तिचा खून केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. जिल्हा न्यायाधीश 3 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश, नागपूर एसी राऊत यांच्या नेतृत्वाखालील नागपूर न्यायालयाने गुड्डू छोटूलाल रजक (40) याला अल्पवयीन मुलीची हत्या केल्याप्रकरणी दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
माहितीनुसार, गुड्डू याचा आरती सोबत विवाह झाला होता. तिच्यापासून त्याला दोन मुली झाल्या. त्याने २०१८ मध्ये कौशल्या पिपरडे हिच्याशी दुसरे लग्न केले. मात्र, त्याच्या विचित्र स्वभावामुळे तीही त्याला सोडून माहेरी गेली. दरम्यान ६ नोव्हेंबरला माही गुड्डू रजक (वय १६) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची सूचना पोलिसांना मिळाली. तपासात त्यांना सुसाईड नोटही मिळाली. त्यात तिने मामाकडून सातत्याने छेडखानी होत असून सावत्र आई कौशल्या पिपरडे, आजोबा दशरथ पिपरडे आणि आजी कल्पना पिपरडे यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली होती. तपासात पोलिसांनी गुड्डू रजक याचा मोबाइल तपासला असता त्याने काही फोटो डिलिट केल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक मदतीने ते फोटो मिळविले. त्यात माही गळफास घेत असल्याचे फोटो असल्याचे आढळले. त्यामुळे गुड्डूला ताब्यात घेत त्याला विचारणा केली असता, त्यानेच तिच्याकडून अशाप्रकारची सुसाईड नोट तयार करीत, माहीला गळफास घेण्याचे नाटक करण्यास सांगितले. टेबलवर उभे करीत, तिला गळ्यात दोरी टाकण्यास सांगितले. तिने तसे करताच, त्याने टेबल पाडला. त्यामुळे गळ्याला फास लागून तिचा मृत्यू झाला. मात्र, याबाबत छोट्या मुलीला काहीही न सागण्यास सांगितले. गुड्डूच्या मोबाइलमध्ये आढळलेल्या फोटोतून त्यानेच मुलीची हत्या करीत पत्नीच्या कुटुंबाला फसविण्याकरिता हा बनाव केल्याचे उघडकीस आले होते.