नागपूर : नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारतीला बॉम्बने उडविण्यात येणार असल्याचा फोन केला आल्याने पोलीस विभागात खळबळ निर्माण झाली. मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील असाच प्रकार झाला होता.
सोमवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्ष डायल ११२ येथे अज्ञात व्यक्तीचा फोन आला व नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या इमारत बॉम्बने उडविण्यात येणार असल्याची धमकी दिली. या घटनेची माहिती बीट मार्शल अभिजीत राऊत यांना देण्यात आली. त्यानंतर नवीन कामठी पोलीस ठाण्याची चौकशी करण्यात आली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
यानंतर पोलिसांना इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून फोन कुठून आला होता याची माहिती काढली. बसस्थानक परिसरातील एका दुकानासमोरून मुकेश मुन्नालाल बागडे (४७, गणेश ले आऊट) याला ताब्यात घेण्यात आले. धमकीच्या फोन संदर्भात त्याला विचारले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मागील आठवड्यात सिताबर्डी पोलीस ठाण्यातदेखील अशाच प्रकारे फोन करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हे पाहता आता शहरातील नागरिकांना पोलिसांचाही धाक उरला नाही का? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.