नागपूर : राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. सत्तेत असताना आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. सत्तांतरणाच्या प्रक्रियेत आम्ही मुंबई मार्गे सुरत आणि गुवाहाटी असा प्रवास नाट्यमयरित्या केला. त्यावरही आता नाटकाची संहिता लिहिली गेली पाहिजे, असे विधान उद्योगमंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेच्यावतीने आयोजित पुरस्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या बाबुराव धनवटे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते अरविंद पाठक यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आम्ही जरी नाटकात काम केले नसले तरी राजकारणात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नाटके करावी लागतात. नाट्य परिषदेचा विस्तार आणि संघटनेत कलावंतांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे. आता संघटनेच्या दृष्टीने नागपूरचे पालकत्व मला मिळाले आहे. त्यामुळे संघटनेला आणि नाट्य परिषदेला काहीही कमी पडू देणार नाही. नागपुरात शंभरावे नाट्य संमेलन भव्यरित्या आयोजितकेले जाणार असल्याचेही सामंत म्हणाले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाटील, सतीश पावडे व नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, शेखर सावरबांधे, नरेश गडेकर उपस्थित होते.