नागपूर: मोमीनपुरा परिसरात बुधवारी पहाटे एका ५२ वर्षीय प्रॉपर्टी डीलरची त्याच्या साथीदाराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जमील अहमद असे मृताचे नाव असून तो हॉटेल रेहमान चौकातील रहिवासी आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद परवेझ मोहम्मद हारून (वय 24, रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा) आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमील आणि परवेज हे प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात व्यावसायिक भागीदार होते. मालमत्तेच्या पैशाच्या वाटणीवरून अलीकडे दोघांमध्ये वाद सुरू होते. जमील आणि परवेझ या दोघांमध्ये यापूर्वीही याच मुद्द्यावरून भांडण झाले होते.
बुधवारी पहाटे दीडच्या सुमारास परवेज त्याच्या दोन साथीदारांसह जमीलच्या घराजवळ आला. अलकरीम हॉटेलचे मालक जमील हे त्यांच्या एका कर्मचाऱ्यासोबत रिसेप्शनवर होते. मालमत्तेवरून मागील भांडणामुळे संतप्त झालेल्या परवेझने बंदूक काढली आणि जमीलच्या डोळ्यात गोळी झाडली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेनंतर जमीलची पत्नी नाहिदा हिने पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, तहसील पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.