नागपूर: नागपुरात ११ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी मनपाच्या अख्यत्यारीत असलेल्या तयारी कार्याचा आढावा घेतला. केवळ व्हीआयपी रोडच नव्हे तर शहरातील सर्वच रस्ते चकाचक करण्याचे आणि फुटपाथ मोकळे करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.
नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन येथील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकील महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह धरमपेठ झोन सभापती रूपा राय, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक निशांत गांधी, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, सहायक आयुक्त (जाहिरात) स्मिता काळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सर्वश्री सुभाष जयदेव, प्रकाश वऱ्हाडे, विजय हुमणे, हरिश राऊत, राजेश कराडे, राजू भिवगडे, महेश मोरोणे, सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभीवर मुख्य रस्त्यांची डागडुजी, फुटपाथची डागडुजी, रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, विद्युत खांबांवरील दिव्यांची सद्यस्थिती, वाहतूक पथदर्शक दिवे, नाल्यांची साफसफाई आदींबाबत सहायक आयुक्त व झोनल अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
जानेवारी २०१८ पासून स्वच्छता सर्वेक्षण सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणाची तयारी व्हावी यासाठी केवळ व्हीआयपी किंवा मुख्य रस्तेच नव्हे तर शहरातील सर्वच रस्ते चकाचक करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिलेत. रस्त्यांच्या डागडुजी आणि सौंदर्यीकरणासोबतच स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असे निर्देश देत लोककर्म विभाग आणि आरोग्य विभागाने समन्वयाने कार्य करावे, असेही महापौरांनी सांगितले.
ज्या दोन डीपी रस्त्यांचे काम सुरू आहे, त्या कामांचा वेग वाढवा, अन्य कामांनाही गती द्या, असे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.