नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली नाही. या मुद्द्यावर विरोधकांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा खोटी आहे. सरकारकडून खोटी आकडेवारी जाहीर करण्यात येत आहे. राज्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणेदेणे नाही, असा घणाघात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादार दानवे यांनी केला. आम्ही सभागृहात कापूस, धान, सोयाबीनला भाव मिळावा यासाठी आवाज उचलणार , असेही विरोधक म्हणाले. आंदोलनात कापसाच्या माळा घालून आमदारांनी ‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पंचनामे करणारे सरकार सुस्त,’ ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा सागर, सरकार देते नुसते गाजर,अशा नारेबाजीने विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडले.
दरम्यान आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादार दानवे, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहिर आदीं बडे नेते सहभागी झाले होते.