नागपूर : वाठोडा परिसरात सदनिकांमध्ये ब्युटी पार्लरच्या नावाखाली सुरु असलेल्या रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला. गेल्या महिन्याभरापासून याठिकाणी आंबटशौकीन ग्राहकांची गर्दी वाढली हाती याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अड्ड्यावर छापा टाकला.
यादरम्यान दोन तरुणीची सुटका करण्यात आली तर दोन महिला दलालांना अटक केली. प्रिया उर्फ इमली भुसिया, रा. पारडी, ममता बोंद्रे ऊर्फ तिवारी रा. वाठोडा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींविरुद्ध वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करून दोन्ही आरोपी महिलांना वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
माहितीनुसार,वाठोडा परिसरात सदनिकांमध्ये ब्युटी पार्लरच्या नावाखाली देहव्यापार सुरु होता. ममता आणि प्रिया या महिला दलालांनी स्वतःच्या घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. ममता ही विवाहित असून, भाड्याच्या घरी एकटीच राहते. तिची मैत्रीण प्रिया हीदेखील विवाहित आहे. प्रिया ही वस्तीतील अल्पवयीन मुली, पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिला, ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणींना पैशाचे आमिष दाखवून हा व्यवसाय करण्यासाठी भाग पाडत होती.
पोलिसांनी सुटका केलेल्या दोन तरुणींपैकी एक तरुणी(२८) मूळची हैदराबादची असून सध्या नागपुरात राहते. ती विवाहित असून पतीपासून वेगळी राहते. दुसरी तरुणी २० वर्षांची असून ती पदवीची विद्यार्थिनी आहे.पोलिसांनी आरोपी महिलांकडून दोन मोबाईल, रोख ५०० रुपये व इतर साहित्य असा एकूण १६ हजार ५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.