नागपूर: नागपुरातील उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यात चार जिप्सी चालक आणि चार मार्गदर्शकांनी वाघिणीला आणि तिच्या पाच बछड्यांना घेराव टाकल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेनंतर अभयारण्य प्रशासनाने या आठ जणांना ७ दिवसांसाठी निलंबित केले आहे. याशिवाय जिप्सी चालकांकडून प्रतिव्यक्ती 2,500 रुपये आणि मार्गदर्शकांकडून 450 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी गोठणगाव तलावाजवळ घडली.
यात जिप्सी चालक व मार्गदर्शकांनी या वाघिणीला व तिच्या पिल्लांना रस्त्यातच घेरले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्यानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक आणि कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी चौकशीचे आदेश दिले. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते वाघांच्या आसपास वाहनांचा वेग आणि वाहन थांबणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाघापासून किमान 30 मीटर अंतरावर वाहने ठेवावीत आणि वाघाच्या पुढे व मागे दोन्ही बाजूने वाहने उभी करणे चुकीचे आहे.