अमरावती : सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला असून आजवर या मुद्यावर जे लोक पोपटासारखे बोलत होते, त्यांच्या तोंडावर बसलेली ही एक थापड आहे. अमरावतीतून नवनीत राणा या प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी दसरा मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.
विरोधकांच्या तोंडावर बसलेली ही चपराक आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा आशीर्वाद त्यांना मिळाला, आता जनतेचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आशीर्वाद मिळून प्रचंड मतांनी या ठिकाणी खासदार होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा यांना १४ दिवस तुरूंगात ठेवले. बारा तास कोठडीत उभे ठेवले. आपल्या देशात हनुमान चालिसा म्हणायची नाही, तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का, असा आपला उद्धव ठाकरेंना सवाल आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. ८० वर्षांपूर्वीचे दस्तावेज आणि सुमारे ३०० कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली होती. ती न्यायालयाने वैध ठरवून नवनीत राणा यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र खरे आहे, असा निकाला दिला आहे.