नागपूर : शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले. आतापर्यंत पूरग्रस्तांचे साडेबारा हजार पंचनामे पूर्ण झाले असून हा आकडा १७ हजारांपेक्षा अधिक वाढू शकतो. २ ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण करून त्यानंतर मदत वितरणालाही सुरुवात होईल. राज्याचीच नाही तर केंद्राची मदत मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहे. नागपुरातील पूरग्रस्तांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनातही विशेष पॅकेज देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी दिली.
२३ सप्टेंबर रोजी नागपुरात आलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, आमदार कृष्णा खोपडे, आमदार आशिष जयस्वाल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत नुकसानग्रस्तांना दुपटीने मदत करण्याची घोषणा केल्याने नुकसानग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. इतकेच नाही तर विविध विभागांचे एकत्रित पॅकेज तयार करून अधिकाधिक मदत कशी देता येईल, याचा विचार सुरू आहे. डिसेंबरच्या अधिवेशनात नागपूरसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही पाटील यांनी दिली.