नागपूर : शहरातील कळमेश्वरजवळील आष्टी गावात असलेल्या भारतीय विद्या मंदिर भवन शाळेत धक्कादायक घटना घडली आहे.इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना शाळेच्या नव्या इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.काठावर असलेला दगड त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी दीड वाजता घडल्याने शाळेच्या परिसरत खळबळ निर्माण झाली. सारंग होमेश्वर नागपूरे (८, रा.जयताळा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
माहितीनुसार सारंग दुपारी मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेच्या मैदानावर फुटबॉल खेळत होता. त्या मैदानावर इमारतीचे बांधकाम सुरु होते. खेळताना फुटबॉल बांधकामासाठी खोदलेल्या एका खड्ड्यात पडला. त्यापाठोपाठ धावत असलेला सारंगही खड्ड्यात पडला.त्यानंतर सरांगच्या डोक्यावर एक दगडही पडला. त्यात सारंग गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला. या घटनेनंतर मुलांनी शाळेतील स्टाफरुममध्ये बसलेल्या शिक्षकांना याबाबत माहिती दिली. शिक्षक धावतच खड्ड्याकडे गेले. तोपर्यंत बराच उशिर झाला होता. बेशुद्धावस्थेत सारंगला नागपुरातील एलेक्सीस रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेमुळे विद्यार्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.