नागपूर: नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील गणेश नगर परिसरात राहणाऱ्या एका तीन वर्षीय बालकाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंश असे मृत मुलाचे नाव आहे. वंशचे वडील कामावर गेले असता आई घरातील कामात व्यस्त असताना वंश हा खेळता खेळता घराच्या बाहेरील गेटजवळ गेला असता तेथे २ ते ३ भटके कुत्रे अगोदरच उपस्थित होते.
यादरम्यानअचानक कुत्र्यांनी वंशवर हल्ला केला. हल्ल्यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांना वंशच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर लोकांनी धाव घेत वंशाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडविले. गंभीररित्या जखमी झालेल्या वंशला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला. वंश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेनंतर परिसरात लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. माहितीनुसार, या हल्ल्यात कुत्र्यांनी वंश याची मान तोंडात दाबली. मानेची मुख्य नस चिरडल्या गेल्याने त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.