नागपूर : शहरातील भंडारा रोडवरील कापसी (खुर्द) परिसरात शुक्रवारी सकाळी एका चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे. जीत बियर बारसमोर हा अपघात झाला, त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. ट्रकमध्ये घरगुती साहित्य भरलेले होते, आग लागल्याने ते जळून खाक झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,ट्रक कापसी खुर्द येथे पोहोचताच त्यातून धूर निघताना दिसला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली.सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग विझवता आली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकमध्ये भरलेल्या हजारो रुपयांच्या घरगुती सामान जाळून खाक झाले.प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण मानले जात आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.