नागपूर: मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश नगर भाजीबाजारात गुरुवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत सोहेल खान या भाजी विक्रेत्याचा खून झाला. ही घटना ठेले लावण्याच्या वादातून उभी राहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार हल्लेखोरांनी रिव्हॉल्वर आणि धारदार शस्त्रांनी सोहेल खानवर हल्ला केला. गोळी मारून व वारंवार चाकूने वार झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात मोहम्मद सुलतान हा त्याचा सहकारीही गंभीर जखमी झाला असून त्याला गळ्याजवळ गोळी लागली आहे.
झोन-२ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, भुषण बहार उर्फ बाळू मांजरे यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित तिघे आरोपी फरार आहेत. खुनासाठी वापरलेली रिव्हॉल्वर व शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
या घटनेचा मागील गुन्हेगारी इतिहासाशी संबंध असल्याची शक्यता आहे. कारण मृत सोहेल खान याच्यावर २०१९ मध्ये कुख्यात गुंड लकी खानवर गोळीबार केल्याचा आरोप होता. त्यामुळे ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. मानकापूर पोलिस सध्या सर्व पैलूंवर सखोल तपास करीत आहेत.