मनपा-ग्रीन व्हिजीलतर्फे पोर्णिमा दिवसाचे आयोजन : नागरिकांचा उदंड प्रतिसाद
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून वीज बचतीत मोलाचे योगदान देणाऱ्या ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रमाच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनद्वारे शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येते. बुधवारी (ता. ११) पोर्णिमेचे औचित्य साधून सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ परिसरात स्वयंसेवकांनी जनजागृती केली. या उपक्रमास नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात ‘पोर्णिमा दिवसा’ची संकल्पना मांडली. पर्यावरणक्षेत्रात कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशच्या सहकार्याने ह्या उपक्रमाला सुरुवात केली. आता ह्याला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असून मनपा आणि ग्रीन व्हिजीलतर्फे प्रत्येक पोर्णिमेला न चुकता ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.
नागपूरचे महापौर संदीप जोशी, आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता. ११) सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठ परिसरातील कल्पना बिल्डींगलगतच्या चौकात मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी जनजागृती केली. रात्री ८ ते ९ वाजतादरम्यान अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन ह्या उपक्रमांतर्गत नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना करण्यात आले. वीज बचतीचे आवाहन करीत आतापर्यंत ह्या उपक्रमांतर्गत हजारो युनीट विजेची बचत करण्यात आल्याची माहिती व्यापाऱ्यांना स्वयंसेवकांनी दिली. केवळ पोर्णिमा दिवसालाच नव्हे तर नियमित अनावश्यक वीज दिवे बंद ठेवले किंवा किमान एक तास बंद केले तर वीज बचत मोहिमेत आपले योगदान मोलाचे ठरेल आणि नागपूर शहराचे नाव जागतिक पातळीवर नोंदविल्या जाईल, असेही आवाहन केले.
स्वयंसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी एक तास अनावश्यक वीज दिवे बंद केले. यापुढेही ह्या चांगल्या उपक्रमात आपला सहभाग राहणार असल्याचे आश्वासन अनेक व्यापाऱ्यांनी दिले. विशेष म्हणजे परिसरातील अनावश्यक पथदिवेही मनपातर्फे एक तासाकरिता बंद करण्यात आले होते.
जनजागृतीच्या या मोहिमेत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलचे कल्याणी वैद्य, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, नम्रता जव्हेरी, प्रिया यादव, शुभम येरखेडे, हस्ती जव्हेरी, तुषार मिरासे सहभागी झाले होते. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मीनगर झोनचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, छोटू थाटसिंगे, सतीश सिरसवान उपस्थित होते.