नागपूर : शहरात सायबर गुन्हेगारीच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. स्वत:च्या लग्नासाठी जुळवलेली १२ लाखांची रक्कम तरुणीच्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगाराच्या झोळीत गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पीडित तरुणीचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बतुल सैफुद्दीन अली (२५, रा. चमन अपार्टमेंट, इतवारी) यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
तुल अली ही अभियंता असून आई व भावासह नागपुरच्या इतवारी परिसरात राहते. अलिकडेच तिचे लग्न जुळले. लग्नासाठी आईने पैशांची जुळवा- जुळवही केली होती. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी सायबर गुन्हेगाराने बतुलच्या मोबाईलवर फोन केला आणि पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. घरबसल्या काम असल्याने बतुलनेही होकार दिला. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल, असे आमिष आरोपीने दिले. मात्र तसे काही झाले नाही.
बतुलने तब्बल १२ लाख रुपये गुंतविले. मात्र मूळ रक्कम किंवा नफ्यापैकी काहीही मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बतुलने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीच्या विविध कलमांशिवाय आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.