नागपूर : घोगरा महादेव येथे मित्रांसोबत सहलीसाठी आलेल्या तरुणाचा बुधवारी सायंकाळी आंघोळीसाठी पेंच नदीत बुडून मृत्यू झाला. पारशिवनी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तरुणाचा मृतेदह नदी बाहेर काढला. रोशन श्रावण पार्टेती (२७) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रोशन हा नागपूरच्या छत्रपती चौकातील बिअर बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी ‘ड्राय डे’ असल्याने बिअर बार, दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे रोशन आणि त्याचे पाच मित्र पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथे सहलीसाठी आले होते.
यादरम्यान रोशन व त्याचे मित्र पेंच नदीजवळील मंदिराच्या मागील भागात फिरायला निघाले. रोशन तलावाच्या काठावर जाऊन उभा राहिला असता त्याचा तोल जाऊन तो थेट नदीत पडला. नीट पोहता येत नसल्याने आणि वेळीच त्याच्या मदतीला कोणीही न आल्याने रोशन तलावात बुडाला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांनी त्याचा शोध सुरू केला, मात्र कमी प्रकाशामुळे सर्च ऑपरेशन मागे घेण्यात आले. गुरुवारी पोलिसांना रोशनचा मृतदेह सापडला.