नागपूर : शहरात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. एका विधवा महिलेवर एका युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद साठवणे असे आरोपी युवकाचे नाव आहे.
माहितीनुसार, मौदा येथे राहणारी पीडित २६ वर्षीय महिला संजना हिच्या पतीचे मार्च २०२१ मध्ये दुर्धर आजाराने निधन झाले. तिला दोन वर्षाचा मुलगाही आहे. आपल्या मुलाला घेऊन ती कामाच्या शोधात गुमथळा येथे राहायला गेली. तेथे तिचा मानलेला भाचा सलमान याचे तिच्या घरी यायचा – जायचा. त्यानंतर सलमानसोबत त्याचा मित्र आरोपी गोपीचंद साठवणे हा यायला लागला.तो वारंवार विधवा असलेल्या संजनाला धमकावू लागला.
तिला मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत बळजबरी लैंगिक अत्याचार करायला लागला. गोपीचंद साठवणे यांच्या अत्याचाराला कंटाळून संजनाने पुन्हा मौदा शहर गाठले. तिची प्रकृती बिघडल्याने ती डॉक्टरकडे गेली असताना तिला ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे कळाले. तिने गोपीचंदला फोन करून ही माहिती दिली असता त्याने आपल्यावरील आरोप फेटाळले. त्यानंतर पीडित महिलेने मौदा पोलिसात गोपीचंदविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरु केला आहे.