Published On : Wed, Aug 30th, 2017

चुकीचे मीटर वाचन करणा-या तेरा रिडर्सचे आधार कार्ड ब्लॉक

Meter Reading

File Pic

नागपूर: वीज ग्राहकांशी संगनमत करुन मीटरचे रिडींग कमी टाकणे, प्रत्यक्ष ग्राहकाकडे न जाता परस्पर मीटर रिडींग टाकणे, यासारख्या अनियमितता करणा-या खासगी एजन्सींच्या तेरा मीटर रिडर्सचे आधार कार्ड ब्लॉक करीत महावितरणने या एजन्सींना चांगलाच दणका दिला असून महावितरणने या मीटर रिडर्सचे आधार कार्ड आपल्या प्रणालीत ब्लॉक केल्याने ही सर्व मीटर रिडर्स आता राज्यात कुठेही महावितरणच्या वीज मीटरचे वाचन करण्यास अपात्र ठरणार आहेत.

वीज ग्राहकांना चुकीची वीजबीले आणि मीटर रिडींगच्या नोंदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी होत असून वीजमीटरचे रीडिंग घेणाऱ्या खासगी एजन्सीज हा घोळ घालत असल्याचा प्रकार लक्षात आल्याने महावितरण प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत त्यांनी घेतलेल्या रिडींगपैकी सरासरी पाच टक्के ग्राहकांच्या रीडिंगचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून “क्रॉस चेकिंग’ ला सुरुवात केली, यात महावितरण कर्मचाऱ्यांनी आणि एजन्सीच्या कर्मचाऱ्याने घेतलेल्या रीडिंगमध्ये तफावत आढळल्याने महावितरण प्रशासनाने ही कठोर कारवाई केली असून यापुढे अश्या चुका वारंवार होत असल्याचे आढळल्यास संबधित एजन्सीला “ब्लॅक लिस्ट’ करुन आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यत अश्या प्रकरणांत तेरा मीटर रिडरवर महावितरणे कारवाई केली असून त्यात त्रिमुर्तीनगर नागपूर उपविभागातील एक, मेहकर उपविभागातील दोन, मंगरुळपीर उपविभागातील एक तर बल्लारशहा उपविभागातील दोन, सडक अर्जुनी उपविभागातील एक, सालेकसा उपविभागातील दोन, गोंदीया शहर उपविभाग आणि गोंदीया ग्रामिण उपविभागातील प्रत्येकी एक, तर गोरेगाव उपविभागातील दोन मीटर रिडरवर महावितरणने कारवाई केल्याने हे तेराही खासगी एजन्सीचे कर्मचारी आता महावितरणमध्ये कुठेही मीटर रिडिंगचे काम करण्यास अपात्र ठरले आहेत.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यापुर्वी एखाद्या मीटर रिडरने त्याच्या कामात चुक केल्यास त्याला त्या कामावरून काढल्या जाई मात्र लगेच दुस-या एजन्सीमार्फ़त तो परत आपले काम करीत असे आणि परत तो पुर्वीच्याच चुका करीत असल्याचे लक्षात आल्याने, महावितरणने सर्व मीटर रीडर्सना आधार क्रमांक बंधनकारक केले होते यामुळे आता एखाद्याने काही गडबड केल्यास त्याचा आधार क्रमांकाची नोंद घेत महावितरणच्या प्रणालीत त्यास ब्लॉक करण्यात येत असल्याने अश्या कर्मचा-यांना मीटर रिंडींगच्या कामापासून दूर ठेवले जाणार आहे. महावितरणने मागिल दोन महिन्यांपासून या एजन्सीजला कामात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या असतांनाही अश्या चुका होत असल्याने महावितरणतर्फ़े ही कारवाई करण्यात आली.

वीज ग्राहकांना अचूक वीजबिले मिळावी यासाठी महावितरण कटिबद्ध असून प्रसंगी यापेक्षाही कठोर कारवाईचे संकेत महावितरण प्रशासनाने दिले आहेत.

Advertisement