नागपूर : डिझल बस ऑपरेटरच्या थकीत देयकामुळे शनिवार २२ सप्टेंबरपासून बंद असलेली ‘आपली बस’च्या प्रश्नावर यशस्वी तोडगा निघाल्याने ही सेवा सुरळीत सुरू झाली आहे. बुधवार २६ सप्टेंबरपासून नागपूर शहरातील ‘आपली बस’च्या सर्व सेवा सुरळीत सुरू होतील.
ऑपरेटरने बस सेवा बंद केल्यानंतर अनेकदा चर्चा करूनही समस्येवर तोडगा निघाला नव्हता. अखेर आज मनपाचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सर्व बस ऑपरेटरला पाचारण केले. सभापती बंटी कुकडे यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, उपायुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी नितीन कापडणीस यांनी तीनही बस ऑपरेटरसोबत जनतेच्या सुविधेच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा केली.
तीनही बस ऑपरेटरला तात्काळ प्रत्येकी दोन-दोन कोटी रुपये देण्याचे ठरविण्यात आले. उर्वरीत थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असे आश्वासनही प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. ऑपरेटर्सनी या निर्णयाला सहमती दर्शवित प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने २५ सप्टेंबर रात्री ९ वाजतापासून ‘आपली बस’ सुरळीत सुरू केली.
सदर बैठकीत परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रमअधिकारी अरुण पिपुर्डे, लेखाधिकारी विजय भारद्वाज उपस्थित होते.