पुणे: माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू गवई यांचे व्यक्तीमत्व चतु:रस्त्र होते. महाराष्ट्र विधीमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेला त्यांच्या जीवनावर आधारित “आजातशत्रू” हा स्मृतिग्रंथ त्यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकणारा असल्याचे गौरोदगार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज काढले.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिवालयातील वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे माजी राज्यपाल, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या जीवनावर आधारीत “आजातशत्रू” हा स्मृतिग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. या स्मृतिग्रंथात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांच्या लेखाचाही या ग्रंथात समावेश आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने व विशेष कार्यअधिकारी राजेंद्र संखे यांच्या हस्ते पाषाण येथील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या “रायगड” या निवासस्थानी या स्मृतिग्रंथाची प्रत त्यांना भेट देण्यात आली. यावेळी प्रशिक्षण केंद्राच्या कक्ष अधिकारी सुनंदा देसाई, सहाय्यक कक्ष अधिकारी संजना मठकर उपस्थित होत्या.
यावेळी स्मृतिग्रंथाचे अवलोकन केल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, रा. सू. गवई हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आणि आमच्या कुटुंबात जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अनेक आठवणी हा स्मृतिग्रंथ चाळताना जाग्या झाल्या. अत्यंत नेटक्यापध्दतीने या स्मृतिग्रंथांची निर्मिती करण्यात आली आहे. या स्मृतिग्रंथाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकण्यात आला आहे. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्यावतीने निर्मिती करण्यात आलेला हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत उपयुक्त आहे. या ग्रंथाची निर्मिती करताना प्रशिक्षण केंद्राने अत्यंत कष्ट घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना दादासाहेबांचे जीवन प्रेरणादायी आहे.
या ग्रंथाच्या माध्यमातून दादासाहेबांच्या विविधांगी व्यक्तीमत्वाचे पैलू सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी दादासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
सुबक आणि वैशिष्ठ्यपूर्ण मांडणी असणाऱ्या “अजातशत्रू” स्मृतिग्रंथाची निर्मिती केल्याबद्दल माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे व ग्रंथाच्या सर्व संपादक मंडळाचे अभिनंदन केले.