नागपूर :केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी र्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून आयुर्विमा आणि वैद्यकीय विम्यावर लावलेला 18 टक्के जीएसटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात नुकतेच नागपूर विभागातील आयुर्विमा महामंडळ कर्मचारी संघटनेने त्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर गडकरींनी हे पत्र लिहिल्याची माहिती आहे.
गडकरी पत्रात म्हणाले की, लोकांना विमा संरक्षण मिळावे यासाठी विम्याच्या प्रीमियमवर कर लावू नये. तसेच, वैद्यकीय विमा प्रीमियमवरील 18 टक्के जीएसटी या सामाजिकदृष्ट्या आवश्यक क्षेत्राच्या वाढीस अडथळा आणत आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या प्रीमियमवर जीएसटी भरणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यांवर जीएसटी मागे घेण्याच्या प्रस्तावाचा प्राधान्याने विचार व्हायला हवा.