मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंजगेबाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. अबू आझमी यांनी औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात भारताचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न २४ टक्के होतं, असा दावा केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली.
विधानपरिषदेत उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अबू आझमी यांनी केलेल्या विधानानंतर त्यांना तुरुंगात का टाकण्यात आले नाही असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं. यावेळी उत्तर देताना, अबू आझमी यांना 100 टक्के तुरुंगात टाकले जाईल.
अबू आझमी असो वा दुसरे कोणीही असो. छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही. आवश्यकता असल्यास आम्ही वरच्या कोर्टात दाद मागू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.