नागपूर : राज्यातील सर्व शेतक-यांना लागणारे रासायनिक खते -बी बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे शेतक-यांनी काळजी करू नये, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतक-यांना केले.
सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे ‘शेतक-यांच्या बांधावर खते-बियाणे योजने’च्या रथाला हिरवी झेंडी दाखवत त्यांनी शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, जिल्हा परिषद सदस्या छायाताई बनसिंगे, ज्योती शिरस्कर, पंचायत समिती सदस्य अरुणा चिकले, खुबाळ्याचे सरपंच यादवराव ठाकरे, उपसरपंच दिलीप खुबाळकर, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. रवींद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मिलींद शेंडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार दीपक कारंडे, तालुका कृषी अधिकारी अरुण कुसाळकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी कोरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड यांची उपस्थिती होती.
योजनेच्या शुभारंभप्रसंगी तूर बियाण्यांची 100 पाकिटे व टप्प्याटप्प्याने 3 टन रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार आहे. नागपूर विभागातील शेतक-यांना लागणारे खते- बी बियाणे, राज्य शासनाकडे असलेला साठा आणि शेतक-यांची प्रत्यक्ष मागणी आदीबाबत आढावा घेतला. राज्यात कृषीक्षेत्रासाठी आवश्यक खतांचा मुबलक साठा आहे. पीककर्ज, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून मिळणा-या मदतीचा आढावा घेतला. तसेच शिखर बँक आणि संलग्नीत बँकांकडून शेतक-यांना लवकरात लवकर पीककर्ज उपलब्ध देण्याचे संबंधित विभागांना आदेश दिले असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
खते-बियाणे मिळत नसल्यास शेतक-यांनी संबंधित कृषी अधिका-याशी संपर्क साधल्यास तात्काळ अडचणी दूर करण्यात येतील. राज्य शासनाने कृषीमालास लॉकडाऊनमधून वगळल्यानंतरही कोरोनामुळे शेतक-यांनी पिकविलेला माल ग्राहकांपर्यंत वेळेत पोहचू शकला नाही. कृषीमाल उत्पादकांना मोठा फटका बसला असल्यामुळे शेतक-यांनी कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळावे, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.
टोळधाडीच्या नुकसानीचे पंचनामे करा
विदर्भातील काही जिल्ह्यात टोळधाडीमुळे शेतक-यांचे नुकसान झाले असून, त्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे हाच उपाय आहे. टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले असल्याचे ते म्हणाले.
शेतक-यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत नवनवे प्रयोग करत आधुनिक शेती करावी. सोबतच कृषीपूरक व्यवसाय, कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योगही गटसमूहातून सुरु करण्याचे शेतक-यांना आवाहन केले. राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असून, ठिबक सिंचनावर भर द्यावा. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी कृषी विभाग शेतक-यांसोबत सदैव असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
गावक-यांची आस्थेवाईक विचारपूस ; खबरदारी घेण्याच्या सूचना
कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी तुमच्या शेतात काय आहे, गावात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, ही आनंदाची बाब आहे. गावक-यांनो काळजी घ्या, सँनिटायजरचा सतत वापर करा, मास्कचा वापर करा, सतत हात धुवा, एकमेकांशी संवाद साधताना सुरक्षित वावराच्या नियमाचे कटाक्षाने पालन करा, अशा खबरदारीच्या सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी खुबाळावासीयांना केल्या.