मुंबई : राज्यात विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विविध मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरले आहे.अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादंग पेटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधान परिषदेत असाच प्रकार पाहायला मिळाला. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामध्ये मोठा वाद पेटला. सभागृहात दोन्ही नेते एकमेकांना शिवीगाळ करताना पाहायला मिळाले. या प्रकारानंतर सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले. मात्र, सभागृहात घडलेल्या या घटनेनंतर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला.
या प्रकरणी संसदीय मंत्र्यांसोबत पक्षीय गटनेत्यांची नीलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक पार पडेल आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणी काय कारवाई करायची याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्द्यावरुन सभागृहात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना अतिशय शिवीगाळ केली. सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, हे वक्तव्य ज्याचे असेल त्याचे, ते लोकसभेत झालेले आहे.
त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. यानंतर सत्ताधारी आमदारांकडून आरडाओरड सुरु झाली. यावेळी अंबादास दानवे यांचा संयम सुटला. “ऐ माझ्याकडे हात करायचा नाही”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली.