नागपूर – शहरात नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) प्रशासनाला दिले.
ना. श्री. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत भाजी व मटण मार्केट, गोकूळपेठ बाजारपेठेचे आर्किटेक्चर डिझाईन, नेताजी मार्केट, फुल मार्केट, कॉटन मार्केट, यशवंत स्टेडियम, क्रेझी कॅसल, डिक दवाखाना, क्रीडांगणे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक आदी विषयांवर चर्चा झाली. महाल येथील बुधवार बाजाराचा आढावा घेताना ना. श्री. गडकरी यांनी कायदेशीर कार्यवाही वेगाने करण्याची सूचना दिली.
बाजारातील किरकोळ व्यापाऱ्यांच्या सोयीने याठिकाणी उत्तम असे मार्केट उभे करण्याचे काम तातडीने होण्याची गरज आहे. ज्या लोकांची उपजीविका भाजी व मटण मार्केटवर अवलंबून आहे, त्यांच्या सर्व सोयीसुविधांचा विचार करून हे काम करावे, असे ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यासोबतच गांधीबाग येथील सोख्ता भवन, दही बाजार, पोहा ओळी येथील नियोजनाचा आढावाही त्यांनी घेतला. आरेंज सिटी स्ट्रीटवरील महानगरपालिकेच्या अख्त्यारीत असलेल्या जागांच्या वापराबाबत काय नियोजन आहे आणि किती दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे, याचीही माहिती सादर करण्यास मंत्री महोदयांनी सांगितले. भूपसंपादन प्रकरणातील मोबदला वितरणही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. गडकरी यांनी दिले.
क्रीडांगणे तातडीने सज्ज करा
नागपूर शहरातील मुले मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावर खेळली पाहिजेत. त्यासाठी शहरातील मैदाने, त्यावर विविध खेळांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक या सर्व बाबी सज्ज असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शहरातील क्रीडांगणांचा आढावा घेऊन तातडीने सज्ज करण्याचे निर्देश ना. श्री. नितीन गडकरी यांनी नागपूर सुधार प्रन्यासला दिले.