नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोखरा रेल्वे क्रॉसिंग फाटक ओलांडून मालगाडी अचानक उलट दिशेने प्रवास सुरु केल्याने मोठा अपघात घडला. मात्र या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री 9.15 वाजेच्या सुमारास घडली असून कार चालक अमोल नारायण घरमारे (वय 35, रा. प्लॉट क्र. 35, महाकाली नगर, मानेवाडा रिंगरोड) याने कारमधून उडी मारून आपला जीव वाचविण्यात यश मिळविले. मात्र, या घटनेत वाहनाचे मोठे नुकसान झाले असून करचा चुराडा झाला. अपघात झाला तेव्हा गेटकीपर ड्युटीवर उपस्थित नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमारे हे हसनबाग येथील आदर्श संस्कार हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून काम करतात. या अपघातात कार चालक आणि मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मालगाडी रेल्वे क्रॉसिंग गेटवरून गेली आणि नंतर अचानक रिव्हर्स आली आणि रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या कार आणि मोटरसायकलला धडकली. ट्रेन रिव्हर्स येत असल्याचे पाहून अमोलला धक्का बसला आणि त्याने वेळीच गाडीतून उडी मारली. गाडीला ट्रेनने धक्का दिला आणि ती रुळावर असलेल्या मोटारसायकलला धडकली. मोटारसायकलस्वारानेही जीव वाचवण्यासाठी उडी मारली पण त्याला फ्रॅक्चर झाले, असे पोलिसांनी सांगितले.
कोराडी पोलिसांनी मालगाडीचा लोको पायलट आणि रेल्वे गेटवर काम करणाऱ्या गेटकीपरविरुद्ध भादंवि कलम ३३८, ४२७ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे कारण शोधण्यासाठी सध्या तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.